Search This Blog

Thursday 18 April 2024

आरटीओ कार्यालयाच्या कामकाज वेळेत बदल


आरटीओ कार्यालयाच्या कामकाज वेळेत बदल

चंद्रपूर दि. १८ :   चंद्रपूर ‍जिल्ह्यातील तापमान वाढ होत असल्यामुळे उष्माघातामुळे कोणीही  बाधित होऊ नये. करिता कार्यालयातर्फे करण्यात येणारे वाहन योग्यता प्रमाणपत्र तपासणी,  पक्की अनुज्ञप्ती चाचणी विषयक कामकाज दि.२२.०४.२०२४ पासून सकाळी ७.०० ते १२.०० वाजेपर्यंत व दुपारी ४.००ते ६.०० वाजेपर्यंतच्या कालावधीत करता येणार आहे. तरी सर्व वाहन चालकांनी याची  नोंद घ्यावीअसे  किरण मोरेप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

000000000

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

 







चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 18 लक्ष 37 हजार 906 मतदार

Ø मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना

चंद्रपूरदि. 15 : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 75 – वरोरा, 76 – वणी आणि 80 – आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजूरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत.

टोकन सुविधा : उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिव्यांग व्यक्तिंसाठी उपाययोजना : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरीता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरीता मदतनीस / स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

००००००

मतदान करा ! आकर्षक बक्षिसे जिंका


 

मतदान करा ! आकर्षक बक्षिसे जिंका

Ø बाईकरेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड मोबाईल

चंद्रपूरदि. 15 : देशाच्या प्रगतीसाठीध्येयधोरणे ठरविण्यासाठी मतदान करून आपला सहभाग लोकशाही प्रक्रियेमध्ये नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे.  13 - चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी 2118 मतदान केंद्रावर होणार असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावेया उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉ मध्ये आकर्षक बक्षिसे जिंका’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर मतदारांनोही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. बस्स.... 19 एप्रिल रोजी मतदान करून सेल्फी अपलोड करा आणि जिंका बाईकरेसींग सायकल आणि ॲन्ड्राईड फोन.

19 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर मतदारांनी शाई लावलेले बोट दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करावा व आपला फोटो अपलोड करून या स्पर्धेत सहभागी व्हावे. फोटो अपलोड करण्यासाठीची लिंक / क्यूआर कोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://chanda.nic.in तसेच जिल्हा परिषदेच्या https://zpchandrapur.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पहिल्या तीन क्रमांकाचे आकर्षक बक्षीसे : प्रथम बक्षीस 1 लक्ष 60 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची अपाची आरटीआर – 1404 व्ही बाईक, (आरटीओ आणि विमा खर्च समाविष्ट). सद्यस्थितीत विसापूर येथील श्रध्देय श्री. अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये ही बाइक प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षीसांमध्ये 91 मिराकी ई-सायकल ( किंमत 35 हजार) आणि सॅमसंग ॲन्ड्राईड फोन (किंमत 20 हजार )

पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक आहे. 2) 19 एप्रिल 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक आहे.

अटी व शर्ती : 1) इच्छुकांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या गुगल फॉर्मवर अपलोड करावा. येथे दिलेला क्यूआर कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो. 2) सेल्फी हा स्पष्ट आणि फिल्टर न केलेला कलर फोटो असावा. 3) सेल्फीमध्ये स्पर्धेत सहभागी होणाऱ्या व्यक्तिचा चेहरात्याचे/तिचे बोट अमिट शाईने (मतदान केल्यानंतर चिन्हांकित) दाखवत मतदान केंद्रासमोर सेल्फी क्लिक करा. 4) सेल्फी 20 एप्रिल 11.59 पीएम पूर्वी अपलोड करणे आवश्यक आहे. अंतिम मुदतीनंतर प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. 5) 20 एप्रिल रोजी एक संगणकावर आधारित अल्गोरिदमिक लकी ड्रॉ काढण्यात येईलजेणेकरून विजेते आणि चार प्रतीक्षा यादीतील उमेदवार घोषित केले जातील. 6) निवडून आलेल्या विजेत्याला त्याचे फोटो ओळखपत्रव्होटर स्लिप आणि पॅन कार्ड सादर करण्यासाठी 23 एप्रिलसंध्याकाळी 5 वाजेपर्यंत तीन दिवसांचा वेळ दिला जाईल. 7) असे करण्यात अयशस्वी झाल्यास प्रतीक्षा यादीतील पुढील उमेदवाराला संधी दिली जाईल.

हे सहभागी ठरू शकतात अपात्र : 1) सेल्फीमध्ये चेहरा अस्पष्ट आहे किंवा बोटावर शाई आहे किंवा मतदान केंद्र दिसत नाही. 2) आवश्यक कागदपत्रे तीन दिवसांत सादर करण्यात अयशस्वी. 3) गुगल फॉर्ममध्ये सर्व तपशील भरलेले नाहीत. 4) चंद्रपूर मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत केलेली नाही. 5) कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत किंवा कायदेशीर गैरव्यवहारात भाग घेतल्याचे आढळण्यात आले. 

तर मतदारांनोया स्पर्धेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेला बळकट करा आणि बक्षीसे जिंकाअसे आवाहन जिल्हा निवडणूक आधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

०००००००

Wednesday 17 April 2024

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा


 इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उपस्थित असतील, त्यांनी तात्काळ चंद्रपूर लोकसभा मतदार संघ सोडावा. येत्या 48 तासांमध्ये बाहेर जिल्ह्यातील राजकीय पक्षासोबत संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी मतदारसंघात राहू नये. असे व्यक्ती सभागृह, हॉटेल किंवा इतर ठिकाणी थांबले असतील, तर त्याबाबत प्रशासनाला तात्काळ कळवावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी म्हटले आहे.

००००००

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

 

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

Ø जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन

चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांच्या नावे संदेशपत्र लिहून जिल्हाधिका-यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहन सुद्धा केले आहे. पुढे ते म्हणतात, भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षी सुद्धा लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

  भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नयेम्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबध्द आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 - चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणा-या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी पत्रातून केले आहे.

०००००००